Wednesday, November 14, 2012

कोरियन हत्ती बोलू लागला...........

दक्षिण कोरियातील हत्ती बोलू लागला...........!



दक्षिण कोरियातील एका हत्तीने कोरियन भाषा शिकल्याने शास्त्रज्ञांना आश्‍चर्यचकित केले आहे. कोरियन भाषेतील पाच शब्द हा हत्ती स्पष्टपणे उच्चारत असल्याचे शास्त्रज्ञांच्या अभ्यासात दिसून आले आहे. यासंबंधीचा अहवाल 'करंट बायोलॉजी' या मासिकात देण्यात आला आहे. कोरियन भाषेतील या शब्दांचा नमस्कार, नाही, बसा, झोपा आणि अच्छा असा अर्थ आहे.




कोशिक असे या हत्तीचे नाव असून, दक्षिण कोरियातील एका प्राणिसंग्रहालयात तो आहे. आपल्या सोंडेला तोंडात आतल्याबाजूला वळवून हा हत्ती माणसाप्रमाणे आवाज काढण्याचा प्रयत्न करतो. कोशिकच्या या प्रयत्नांवर संशोधन करण्यात येत आहे. यामुळे माणसाप्रमाणे आवाज काढता येणाऱ्या प्राण्यांच्या यादीत आता हत्तीचा देखील समावेश करयचा का? हा प्रश्न संशोधकांना पडला आहे. माणसाप्रमाणे आवाज काढण्याची क्षमता असणारे पोपट, मैना हे पक्षी आहेत. तर व्हेल माशांच्या एका जातीचाही शोध नुकताच लागला आहे.

ऑस्ट्रियाच्या व्हियेना विद्यापीठातील अध्यापक आणि प्रमुख संशोधक अँगेला स्टॉयगर यांनी यू-ट्यूबवरचा कोशिकचा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला त्याबद्दल कळाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर त्यांच्या संशोधनाला सुरवात झाली. जेव्हा स्टॉयगर यांनी प्राणिसंग्रहालयाने यू ट्यूबवर टाकलेला व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी तेथे जाऊन कोशिकचा आवाज रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांनी कोशिक कोरियन भाषेतील पाच शब्द स्पष्ट पण उच्चारत असल्याचे म्हटले आहे.

यावर पुढील संशोधन करण्यात येत असून कोशिक हत्ती बोलताना क्ष-किरणांच्या साहाय्याने त्याचे निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे आपली सोंड आत घेऊन हा हत्ती तोंडाची कोणत्याप्रकारे हालचाल करतो हे समजण्यास मदत होणार आहे. याशिवाय कोशिक या शब्दांचा उच्चार स्पष्टपणे करत असला तरी त्याचा अर्थ त्याला समजतो का? किंवा हत्तीमध्ये भाषा समजण्याची क्षमता असू शकते का? यावरदेखील संशोधन करण्याची गरज असल्याचे स्टॉयगर यांनी म्हटले आहे.

कोशिक पाच वर्षाचा होता तेव्हापासून १२ वर्षाचा होईपर्यंत तो या प्राणिसंग्रहालयात एकटाच हत्ती होता. तसेच हा काळ हत्तींच्या वाढीतील सर्वांत महत्त्वाचा काळ असल्याचेही स्टॉयगर यांनी म्हटले आहे.





*सौजन्य (वृत्तसंस्था)

No comments:

Post a Comment